नमस्कार मैत्रिणींनो,
आधीच्या काळात नवऱ्याचं नाव न घेणं, अहो-जाओ करणं, उखाणा घेताना लाजेने चूर होणं हे खूपच सामान्य होतं. तो काळच तसा होता.

पण आत्ताचा काळ वेगळा आहे. बऱ्याच मुलींना वाटेल, ज्याला रोज नावानेच हाक मारतो, त्याचे नाव घेण्यासाठी खास उखाणा घ्यायची काय गरज? लाजणे तर दूरच राहिले. केवळ शास्त्र म्हणून या सगळ्या ‘outdated’ परंपरा पाळत राहायच्या का?

अगदी बरोबर आहे तुमचं. गरज खरंच काहीच नाही. पण तुम्ही उखाण्यांकडे केवळ एक प्रथा म्हणून न बघता वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलत तर?

आता हेच बघा ना… नेहमी एकेरी नाव ऐकण्याची सवय असणाऱ्या नवऱ्याला ‘राव’ ऐकण्याचे भाग्य फक्त उखाण्यामुळेच लाभते. हो ना? मग अधून-मधून त्याला जरा भाव दिला तर त्यात काय बिघडलं?

आणि उखाण्याच्या बहाण्याने मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना तुम्हाला चिडवण्याची आयती संधी मिळते ती वेगळीच. तेवढीच जरा गंमत आणि टाईमपाससुद्धा! वातावरणही जरा हलके-फुलके होते.

म्हणूनच उखाण्यांना एखादी कालबाह्य प्रथा समजून सोडून न देता, नवी फोडणी देऊन अजून रंगतदार बनवूया. काय? पटतंय ना?

चला तर मग बघूया, लग्नात तसेच लग्नानंतरही घेता येतील असे सोपे, सुंदर मस्त मराठी उखाणे.

 
हे उखाणे कसे घ्याल?
अगदी सोप्पं आहे. फक्त रिकाम्या जागी तुमच्या जोडीदाराचे नाव घ्या. एवढंच! आहे की नाही सोप्पं?

चला तर मग, उखाणे बघूया.

मोहरली माझी काया, लागता नवी चाहूल, ___रावांचे नाव घेते, जड झाले पाऊल

__च्या दर्शनाला लागतात, लांबच लांब रांगा, __रावांचे नाव घ्यायला, मला कधीही सांगा 

बाळाच्या आगमनाने, दरवळला परिसर, ___ रावांच्या सहवासात, जीवन होईल सफल

वरुणराजा वरुणराजा, पाऊस येऊ दे  जोरात, ___रावांचे नाव घेते, ___च्या घरात

देवापुढे लावली, समईची जोडी, ___रावांमुळे आली, आयुष्याला गोडी

साताऱ्याचे पेढे, नाशिक चा चिवडा, __ राव मला, तुम्ही जन्मोजन्मी निवडा 

मुद्दाम नाही करत, नकळत हे घडतं, माझं मन रोज नव्याने, __च्याच प्रेमात पडतं

बाळाच्या नाजूक गालावर, पडते इवलीशी खळी, ___रावांच्या संसारवेलीवर, उमलली नाजूक कळी

श्रावणात असतो, रोज नवीन सण, ___ला सुखी ठेवण्याचा, घेतलाय मी पण

फांद्या तोडून नका घेऊ, वटवृक्षाचे प्राण, ____राव म्हणतात झाडं म्हणजे, ऑक्सिजन ची खाण