नमस्कार मैत्रिणींनो,
आधीच्या काळात नवऱ्याचं नाव न घेणं, अहो-जाओ करणं, उखाणा घेताना लाजेने चूर होणं हे खूपच सामान्य होतं. तो काळच तसा होता.

पण आत्ताचा काळ वेगळा आहे. बऱ्याच मुलींना वाटेल, ज्याला रोज नावानेच हाक मारतो, त्याचे नाव घेण्यासाठी खास उखाणा घ्यायची काय गरज? लाजणे तर दूरच राहिले. केवळ शास्त्र म्हणून या सगळ्या ‘outdated’ परंपरा पाळत राहायच्या का?

अगदी बरोबर आहे तुमचं. गरज खरंच काहीच नाही. पण तुम्ही उखाण्यांकडे केवळ एक प्रथा म्हणून न बघता वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलत तर?

आता हेच बघा ना… नेहमी एकेरी नाव ऐकण्याची सवय असणाऱ्या नवऱ्याला ‘राव’ ऐकण्याचे भाग्य फक्त उखाण्यामुळेच लाभते. हो ना? मग अधून-मधून त्याला जरा भाव दिला तर त्यात काय बिघडलं?

आणि उखाण्याच्या बहाण्याने मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना तुम्हाला चिडवण्याची आयती संधी मिळते ती वेगळीच. तेवढीच जरा गंमत आणि टाईमपाससुद्धा! वातावरणही जरा हलके-फुलके होते.

म्हणूनच उखाण्यांना एखादी कालबाह्य प्रथा समजून सोडून न देता, नवी फोडणी देऊन अजून रंगतदार बनवूया. काय? पटतंय ना?

चला तर मग बघूया, लग्नात तसेच लग्नानंतरही घेता येतील असे सोपे, सुंदर मस्त मराठी उखाणे.

 
हे उखाणे कसे घ्याल?
अगदी सोप्पं आहे. फक्त रिकाम्या जागी तुमच्या जोडीदाराचे नाव घ्या. एवढंच! आहे की नाही सोप्पं?

चला तर मग, उखाणे बघूया.

सूर्याच्या किरणांनी, उगवली पहाट,  __रावांमुळे झाली, सुखकर प्रत्येक वाट

झुळूझुळू पाण्यात, हळू हळू चाले होडी, शोभून दिसते सर्वांमध्ये, __ व माझी जोडी

दीन दुबळ्यांचे गाऱ्हाणे, परमेश्वरानी ऐकावे, ___रावांसारखे पती मिळाले, आणखी काय मागावे?

यमुनेच्या पाण्यात, ताजमहालाचे पडते प्रतिबिंब, ____चे नाव घेण्यास, कशाला करू विलंब?

उखाणा घेते मी, खूपच Easy, ___राव असतात नेहमी, कामामध्ये Busy

विद्येचा नसावा अभिमान, श्रीमंतीचा नसावा गर्व, __ रावांचे नाव घेते, ऐकताय ना सर्व?

दवबिंदूंनी चमकतो, फुलांचा रंग, सुखी आहे संसारात, __ च्या संग 

देवघरात तेवतो, नंदादीप समाधानाचा, ___ रावांचे नाव घेऊन, आशीर्वाद मागते अखंड सौभाग्याचा

चांदीच्या ताटात, __चे पेढे, __माझे हुशार, बाकी सगळे वेडे!

आई बाबांनी केले लाड, सासू सासऱ्यांनी पुरवली हौस, __च नाव घ्यायला, मला येते फारच मौज