नमस्कार मैत्रिणींनो,
आधीच्या काळात नवऱ्याचं नाव न घेणं, अहो-जाओ करणं, उखाणा घेताना लाजेने चूर होणं हे खूपच सामान्य होतं. तो काळच तसा होता.

पण आत्ताचा काळ वेगळा आहे. बऱ्याच मुलींना वाटेल, ज्याला रोज नावानेच हाक मारतो, त्याचे नाव घेण्यासाठी खास उखाणा घ्यायची काय गरज? लाजणे तर दूरच राहिले. केवळ शास्त्र म्हणून या सगळ्या ‘outdated’ परंपरा पाळत राहायच्या का?

अगदी बरोबर आहे तुमचं. गरज खरंच काहीच नाही. पण तुम्ही उखाण्यांकडे केवळ एक प्रथा म्हणून न बघता वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलत तर?

आता हेच बघा ना… नेहमी एकेरी नाव ऐकण्याची सवय असणाऱ्या नवऱ्याला ‘राव’ ऐकण्याचे भाग्य फक्त उखाण्यामुळेच लाभते. हो ना? मग अधून-मधून त्याला जरा भाव दिला तर त्यात काय बिघडलं?

आणि उखाण्याच्या बहाण्याने मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना तुम्हाला चिडवण्याची आयती संधी मिळते ती वेगळीच. तेवढीच जरा गंमत आणि टाईमपाससुद्धा! वातावरणही जरा हलके-फुलके होते.

म्हणूनच उखाण्यांना एखादी कालबाह्य प्रथा समजून सोडून न देता, नवी फोडणी देऊन अजून रंगतदार बनवूया. काय? पटतंय ना?

चला तर मग बघूया, लग्नात तसेच लग्नानंतरही घेता येतील असे सोपे, सुंदर मस्त मराठी उखाणे.

 
हे उखाणे कसे घ्याल?
अगदी सोप्पं आहे. फक्त रिकाम्या जागी तुमच्या जोडीदाराचे नाव घ्या. एवढंच! आहे की नाही सोप्पं?

चला तर मग, उखाणे बघूया.

इतकी छान सासू मिळाली, भाग्य माझे थोर, संसाराच्या IPL मध्ये, आता रोजच सिक्स आणि फोर

यमुनेच्या पाण्यात पडली, ताजमहालाची सावली, ____रावांची जन्मदात्री, धन्य ती माऊली

निसर्गरूपी आकाशाला, सूर्यरूपी माळी, ___रावांचे नाव घेते, ___च्या वेळी

(देवाचे नाव) आशीर्वाद दे, येऊ दे भाग्या भरती, ___रावांच्या उत्कर्षाची, कमान राहू दे चढती!

मोगऱ्याचा सुगंध, स्पर्धा करतो निशिगंधाशी, ___ चे नाव घेते, ___च्या दिवशी

फुलांइतकीच मोहक दिसते, गुलाबाची कळी, ___ रावांचे नाव घेते, ___च्या वेळी

उन्हामध्ये फिरून, skin झाली आहे tan, ___राव आहेत, माझे मोठे fan

तांदुळाला इंग्लिशमध्ये, म्हणतात Rice, ___राव आहेत, माझी पहिली Choice

एकाच सोसायटीत राहून, झाले आमचे प्रेम, माझ्या नावापुढे अखेर, ___रावांचे लागले Surname

सगळ्या भाज्यांमध्ये, कार्ले सगळ्यात कडू, ___  चे नातेवाईक पुष्कळ, कोणाकोणाच्या पाया पडू?