नमस्कार मित्रमंडळींनो,
लग्नानंतर किमान वर्षभर तरी प्रत्येक सण – समारंभाला उखाणे घेतल्याशिवाय तुमची सुटका नाही. आज काय तर सत्यनारायणाची पूजा, उद्या वटसावित्रीची, आणि परवा हळदी कुंकू …  अरे देवा… आता सारखे सारखे एवढे उखाणे पाठ तरी कसे करायचे?

बरं, नुसत्या सणासुदीलाच नाही, तर अगदी नातेवाईकांच्या घरी जोडीने भेटायला गेलं तरीही मुद्दाम चिडवण्यासाठी घास भरवण्याचा आणि त्यायोगाने नाव घ्यायचा  आग्रहही आलाच. आता आयत्या वेळी उखाणे सुचणार तरी कसे?

आणि मग तुमच्या चेहऱ्यावर वाजलेले बारा बघून फिदी-फिदी हसणारी मंडळीही काही कमी नाहीत! मग अश्या वेळी करायचे तरी काय?

तुम्हीसुद्धा निरनिराळ्या दिवसांसाठी निरनिराळे उखाणे पाठ करून हैराण झाला आहेत का? मग सादर आहेत, खास तुमच्यासाठी, वर्षभर कोणत्याही पूजेला तसेच सण – समारंभाला घेता येतील असे उखाणे. आता पाठांतराचे NO TENSION!
हे उखाणे कसे घ्याल?
स्त्रिया आणि पुरुष, असे दोघेही हे उखाणे घेऊ शकतात.

नेहमीच्या उखाण्यांमध्ये फक्त एकच जागा रिकामी असते, ती म्हणजे तुमच्या जोडीदाराच्या नावाची.

पण सर्व प्रकारच्या पूजा आणि सण -समारंभाला चालणाऱ्या या उखाण्यांमध्ये तुम्हाला २ ठिकाणी रिकाम्या जागा दिसतील. एका ठिकाणी तुमच्या जोडीदाराचे नाव आणि दुसऱ्या ठिकाणी येईल त्या सोहळ्याचे नाव.

म्हणजे, जर तुमच्याकडे मंगळागौर असेल तर तुम्ही म्हणाल,

(जोडीदाराचे नाव) चे नाव घेते/घेतो, मंगळागौरीच्या दिवशी! 

आता पुढच्या वेळी, जर तुमच्याकडे सत्यनारायणाची पूजा असेल, तर तुम्ही तोच उखाणा परत घेऊ शकता. फक्त या वेळी तुम्हाला म्हणावे लागेल…

(जोडीदाराचे नाव) चे नाव घेते/घेतो, सत्यनारायण पूजेच्या दिवशी! 

कळलं? अगदी सोप्पं आहे ना?

आता तुम्ही तुम्हाला आवडलेले २-३ निवडक उखाणे पाठ करा, आणि प्रत्येक वेळी तेच उखाणे फक्त सोहळ्याचे नाव बदलून आलटून पालटून घ्या.

चुकून नवऱ्याचे नाव मात्र बदलू नका हं! मग मात्र गडबड होईल.

अहो चिडू नका…मस्करी केली थोडीशी.

चला तर मग, उखाणे बघूया.

श्रावणात आकाशात, कडकडतात विजा,  __रावांसोबत करते, __ची पूजा

प्रेमाला नसते मोजमाप, नसते लांबी रुंदी, आज भरवते__ला, गोड गोड बासुंदी

___च्या पूजेने करू, नवीन कार्याची सुरवात, ___रावांचे नाव घेऊन, देवापुढे लावते फुलवात

वडाची पूजा करून, मागितले दीर्घायुष्याचे दान, ____रावांसोबत, मी संसार करीन छान

__च्या दिवशी, फुलांची आरास, __ रावांना भरवते, __ चा घास

___ची पूजा, मनोभावे करते, ___रावांसाठी, दीर्घायुष्य मागते

वटवृक्ष सांगतो, सत्यवान-सावित्रीचा इतिहास, ____रावांचे नाव घेते, वटपौर्णिमेसाठी खास

संसाराच्या गणिताचे, सुरु झाले पाढे, __च नाव घेऊन, भरवते मी पेढे!

___समोर ठेवल्या, पंचपक्वान्नाच्या राशी, ___ रावांचे नाव घेते, ___च्या दिवशी

शिवाजीसारखा पुत्र, धन्य जिजाऊची कुशी, ___ चं नाव घेते, ___च्या दिवशी