नमस्कार चिरतरुण मित्रमंडळींनो,
आज आम्ही साठी ओलांडलेल्या आमच्या खास वाचकांसाठी खास उखाणे घेऊन आलो आहोत.

आता तुम्ही म्हणाल, “या वयात कसले आलेत उखाणे? अहो आमच्या नातवंडांची लग्नाची वयं झाली. जाड भिंगाचा चष्मा आला, गुडघ्याच्या वाट्याही झिजल्या, कवळीही येईल लवकरच. आता कसले उखाणे आणि कसलं काय!”

अरेरे.. काय हे तुमचे विचार! वय झालं म्हणून काय झालं, अहो म्हातारपण म्हणजे दुसरे बालपण. देवाने पुन्हा एकदा मौजमजा करण्याची दिलेली नामी संधी. मग आता घ्या ना बिनधास्त जगून!

सगळे दिवस मस्त साजरे करा. लहर आली की हे उखाणे घेऊन तुमच्या जोडीदाराला परत तरुणपणीच्या दिवसांची आठवण करून द्या.

अगदीच नाही, तर लग्नाच्या वाढदिवसाला तरी हे उखाणे घ्या.

शेवटी, तुम्ही केवळ शरीराने तरुण असण्यापेक्षा, मनाने किती चिरतरुण आहेत हे महत्वाचं, हो ना?

काय मग? घेणार ना हे उखाणे?
हे उखाणे कसे घ्याल?
स्त्रिया आणि पुरुष, असे दोघेही हे उखाणे घेऊ शकतात. तुम्ही तर इतक्या वर्षांमध्ये उखाण्यांची पारायणं केली असतील. त्यामुळे उखाणे कसे घ्यायचे हे आम्ही नव्याने काय सांगणार? चला तर मग, उखाणे बघूया.

गनिमांवर केली शिवरायांनी, पराक्रमाने मात, ___रावांच्या प्रेमाची, मिळो जन्मोजन्मी साथ

सौख्याच्या वाऱ्यासंगे, आनंद मेघ आले, __रावांच्या संसारात, मी अमृतात न्हाले

प्रेमाच्या रेशीम धाग्यांनी, सौख्य मी विणले, __रावांच्या साथीने, जीवनपुष्प बहरले

जुईच्या वेलीवर लागली, सुगंधी नाजूक फुले, ___ ने दिली मला, दोन गोड  मुले 

झाले आता वय, जवळ आली साठी,  शंभरी नक्की गाठेन, __चे प्रेम असता पाठी

थोडं चाललं तरी, दुखतात गुढग्याच्या वाट्या, __मुळे तरलो आजवर, झेलीत सुख दुःखाच्या लाटा

सूर्याच्या किरणांनी, उगवली पहाट,  __रावांमुळे झाली, सुखकर प्रत्येक वाट

केस झाले पांढरे, तरी मिशी अजून काळी, माझ्या संसारवेलीचे __राव माळी

__मुळे झाली माझी, सेकंड इनिंग सुरु, हसत खेळत आम्ही आता __टूर करू   

माझ्या सुंदर हास्यामागे __चाच हात, __चा लाडू खाता खाता, तुटला की हो दात