वर्षानुवर्षे तेच तेच जुने उखाणे उगाळत बसून कंटाळा आलाय? मग ही वेबसाईट खास तुमच्यासाठीच!
नमस्कार!
‘बेस्ट मराठी उखाणे‘ मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत.
लग्न असो वा पूजा, कोणतेही शुभ कार्य / सणासुदीला उखाणा हा हवाच!
आणि उखाणा घ्या म्हटलं, की मग सुरु होते,
भाजीत भाजी मेथीची, __माझ्या प्रीतिची
किंवा
नाव घ्या नाव घ्या आग्रह आहे सर्वांचा….
असे अश्मयुगातील उखाणे, हो हो.. अश्मयुगातलेच आहेत ते. प्रचंड जुने! चांगले नाहीत असं नाही. पण किती वेळा घ्यायचे यालाही काही मर्यादा नको का? वर्षानुवर्षे उगाळून उगाळून पार रसहीन झालेत हो! अगदीच मुळमुळीत आणि बेचव. सगळ्या समारंभांमध्ये अगदी न चुकता एकदा तरी ऐकले जातातच! हो ना? सगळ्यांनी ऐकलेले आणि सगळ्यांना तोंडपाठ! ना बोलणाऱ्याला मजा वाटते, ना ऐकणाऱ्याला रस.
उखाण्यांचे पुस्तक किंवा अगदी ऑनलाईन शोधायला जावं तर डोंगर पोखरून उंदीर काढल्यासारखे मोजकेच ‘बरे’ आणि खरोखर ‘घेता येण्यासारखे’ उखाणे सापडतात. तुम्हालाही असा अनुभव आलाय का हो?
त्यात आजकालच्या पिढीची स्टाइलच किती वेगळी!
नेहमी एकेरी नाव ऐकण्याची सवय असणाऱ्या नवऱ्याला ‘राव’ ऐकण्याचे भाग्य फक्त उखाण्यातच मिळत असेल. त्यातही उखाणे कसे, लांबलचक नकोत. मोठे जड शब्द तर अजिबातच नकोत. साधे सोपे आणि सुटसुटीत हवेत. पटकन वाचून झटकन पाठ होणारे !
आणि यात चुकीचे तरी काय बरे? आत्ताच्या धावपळीच्या जगात एवढे जड जड उखाणे पाठ करणं म्हणजे दिव्यच! त्यात सुद्धा इंग्लिश माध्यमात शिकलेले असाल तर अगदी साध्या साध्या उच्चारांपासूनच नाकी नऊ येतात. हो ना?
म्हणूनच, ‘बेस्ट मराठी उखाणे’ च्या माध्यमातून आम्ही घेऊन येत आहोत, नव्या पिढीला साजेसे छोटे सोपे उखाणे. पण याचा अर्थ आम्ही जुन्या पिढीला विसरलो असं नाही बरं का ! त्यांच्यासाठीही नव्या-जुन्या उखाण्यांचा नजराणा येताच राहील.
Note: Special thanks to Pexels, Pixabay & Unsplash for providing great stock images.