नमस्कार मित्रांनो,
बायकोने उखाणा घेतला की ‘राव’ ही पदवी ऐकून मनाला क्षणिक का होईना, खूप बरे वाटते. एकदम मोठा माणूस झाल्यासारखे वाटते. हो ना?

पण मग तुम्हाला कोणी तुमच्या प्रेयसी / बायकोसाठी उखाणा घ्यायला सांगितलं तर तुमची बोबडी का बरं वळते ?

पुरुषांचा आणि उखाण्यांचा बऱ्याचदा ३६ चा आकडा असतो. उखाणे? नको रे बाबा…  किंवा, अरे उखाणे बायकांसाठी असतात. मर्द मराठ्यांसाठी नाहीत…अशा  सबबी पुढे करून नाव घेणं टाळण्यात तर तुम्ही एकदम उस्ताद!

आणि मग प्रेयसी / बायकोने खूपच आग्रह केला तर, “मी तुझ्यासाठी आकाशातून एक वेळ चंद्र-तारे तोडून आणू  शकतो… पण  हे उखाणे घ्यायला मात्र मला नको सांगूस” असे बोलून मोकळे होण्यातही तुम्ही पटाईत.

काय हे! तुमच्या जोडीदाराच्या चेहऱ्यावर मस्त गोड हसू फुलवण्यासाठी तुम्ही एवढं पण नाही करू शकत?

आता तुमची सुद्धा काय चूक म्हणा, तुम्हाला उखाणे कसे, लांबलचक नकोत. मोठे जड शब्द तर अजिबातच नकोत. साधे सोपे आणि सुटसुटीत हवेत. पटकन वाचून झटकन पाठ होणारे!

आणि यात चुकीचे तरी काय बरे? आत्ताच्या धावपळीच्या जगात एवढे जड जड उखाणे पाठ करणं म्हणजे दिव्यच! त्यात सुद्धा इंग्लिश माध्यमात शिकलेले असाल, तर अगदी साध्या साध्या उच्चारांपासूनच नाकी नऊ येतात. हो ना?

म्हणूनच आम्ही सादर करत आहोत, खास पुरुषांसाठी पाठ करायला अगदी सोपे, छोटे असे लग्नात तसेच लग्नानंतरही घेता येणारे मस्त मराठी उखाणे.

आता उखाणे न घेण्याच्या सबबींना करा राम राम!
हे उखाणे कसे घ्याल?
अगदी सोप्पं आहे. फक्त रिकाम्या जागी तुमच्या जोडीदाराचे नाव घ्या. एवढंच! आहे की नाही सोप्पं?

चला तर मग, उखाणे बघूया.

ताजमहाल बनवायला, कारागीर होते कुशल, __च नाव घेतो, तुमच्यासाठी स्पेशल

कधीही फोन केलात तरी, लाईन लागेल व्यस्त, _च्या प्रेमात, मी बुडलोय जबरदस्त

मोगऱ्याचा सुगंध, पावसाळ्यातील मृदगंध, __शी जुळले आता, रेशमी ऋणानुबंध 

तुरीच्या डाळीला, जिऱ्याची फोडणी, बघताक्षणी प्रेमात पडलो, __ ची लाल ओढणी

सीतेसारखे चारित्र्य, रंभेसारखे रूप,  ___च्या सोबत, मी आनंदी आहे खूप 

फुलांच्या तोरणात, आंब्याचे पान, __च्या रूपाने, झालो मी बेभान

__च्या मैदानात, खेळत होतो क्रिकेट, __ला पाहून, पडली माझी विकेट!

देवाच्या देव्हाऱ्यात, फुलांना प्रथम स्थान, ___ने दिला मला, पतिराजांचा मान

सासरची छाया, माहेरची माया,  __ राव आहेत, माझे सर्व हट्ट पुरवाया

__माझी आहे, सर्व कलांमध्ये कुशल, तुमच्या येण्यानं झाला, दिवस एकदम स्पेशल