नमस्कार मित्रांनो,
बायकोने उखाणा घेतला की ‘राव’ ही पदवी ऐकून मनाला क्षणिक का होईना, खूप बरे वाटते. एकदम मोठा माणूस झाल्यासारखे वाटते. हो ना?

पण मग तुम्हाला कोणी तुमच्या प्रेयसी / बायकोसाठी उखाणा घ्यायला सांगितलं तर तुमची बोबडी का बरं वळते ?

पुरुषांचा आणि उखाण्यांचा बऱ्याचदा ३६ चा आकडा असतो. उखाणे? नको रे बाबा…  किंवा, अरे उखाणे बायकांसाठी असतात. मर्द मराठ्यांसाठी नाहीत…अशा  सबबी पुढे करून नाव घेणं टाळण्यात तर तुम्ही एकदम उस्ताद!

आणि मग प्रेयसी / बायकोने खूपच आग्रह केला तर, “मी तुझ्यासाठी आकाशातून एक वेळ चंद्र-तारे तोडून आणू  शकतो… पण  हे उखाणे घ्यायला मात्र मला नको सांगूस” असे बोलून मोकळे होण्यातही तुम्ही पटाईत.

काय हे! तुमच्या जोडीदाराच्या चेहऱ्यावर मस्त गोड हसू फुलवण्यासाठी तुम्ही एवढं पण नाही करू शकत?

आता तुमची सुद्धा काय चूक म्हणा, तुम्हाला उखाणे कसे, लांबलचक नकोत. मोठे जड शब्द तर अजिबातच नकोत. साधे सोपे आणि सुटसुटीत हवेत. पटकन वाचून झटकन पाठ होणारे!

आणि यात चुकीचे तरी काय बरे? आत्ताच्या धावपळीच्या जगात एवढे जड जड उखाणे पाठ करणं म्हणजे दिव्यच! त्यात सुद्धा इंग्लिश माध्यमात शिकलेले असाल, तर अगदी साध्या साध्या उच्चारांपासूनच नाकी नऊ येतात. हो ना?

म्हणूनच आम्ही सादर करत आहोत, खास पुरुषांसाठी पाठ करायला अगदी सोपे, छोटे असे लग्नात तसेच लग्नानंतरही घेता येणारे मस्त मराठी उखाणे.

आता उखाणे न घेण्याच्या सबबींना करा राम राम!
हे उखाणे कसे घ्याल?
अगदी सोप्पं आहे. फक्त रिकाम्या जागी तुमच्या जोडीदाराचे नाव घ्या. एवढंच! आहे की नाही सोप्पं?

चला तर मग, उखाणे बघूया.

अभिमान नाही विद्येचा, गर्व नाही रुपाचा, ___ला भरवितो घास, वरण-भात-तुपाचा

कृष्णाच्या बासरीचा, राधेला लागला ध्यास , ___ला भरवितो मी, ___चा घास

Exams मध्ये व्हायचो, मी चांगल्या नंबराने पास, __ला भरवतो, __चा घास

पंचपक्वान्नांनी भरले, चांदीचे ताट, __खा लवकर, बघत आहेत सर्व वाट

__च्या दिवशी, मस्त जमली पंगत,  __ला घास भरवून, वाढवतो मी रंगत

आजच्या सोहळ्याचा, थाट केलाय खास, __ला भरवतो, __चा घास

रंगांची उधळण करत, आली आता होळी, __ला भरवतो, तिचीच पुरणपोळी

अगं अगं __, खिडकीत आला बघ काऊ, घास भरवतो__चा, बोटं नको चाऊ

एक होती चिऊ आणि एक होता काऊ, __ला भरवलं तर, मी काय खाऊ? 

__ला भरवण्यात, येतो आनंद आगळा, घे पटकन नाहीतर, मी फस्त करेन सगळा