नमस्कार चिरतरुण मित्रमंडळींनो,
आज आम्ही साठी ओलांडलेल्या आमच्या खास वाचकांसाठी खास उखाणे घेऊन आलो आहोत.

आता तुम्ही म्हणाल, “या वयात कसले आलेत उखाणे? अहो आमच्या नातवंडांची लग्नाची वयं झाली. जाड भिंगाचा चष्मा आला, गुडघ्याच्या वाट्याही झिजल्या, कवळीही येईल लवकरच. आता कसले उखाणे आणि कसलं काय!”

अरेरे.. काय हे तुमचे विचार! वय झालं म्हणून काय झालं, अहो म्हातारपण म्हणजे दुसरे बालपण. देवाने पुन्हा एकदा मौजमजा करण्याची दिलेली नामी संधी. मग आता घ्या ना बिनधास्त जगून!

सगळे दिवस मस्त साजरे करा. लहर आली की हे उखाणे घेऊन तुमच्या जोडीदाराला परत तरुणपणीच्या दिवसांची आठवण करून द्या.

अगदीच नाही, तर लग्नाच्या वाढदिवसाला तरी हे उखाणे घ्या.

शेवटी, तुम्ही केवळ शरीराने तरुण असण्यापेक्षा, मनाने किती चिरतरुण आहेत हे महत्वाचं, हो ना?

काय मग? घेणार ना हे उखाणे?
हे उखाणे कसे घ्याल?
स्त्रिया आणि पुरुष, असे दोघेही हे उखाणे घेऊ शकतात. तुम्ही तर इतक्या वर्षांमध्ये उखाण्यांची पारायणं केली असतील. त्यामुळे उखाणे कसे घ्यायचे हे आम्ही नव्याने काय सांगणार? चला तर मग, उखाणे बघूया.

घरातील सर्वांवरच, अथांग तुमची माया, आयुष्यभर घरच्यांसाठी, ___नी झिजवली काया

सेकंड इनिंग मध्ये करतोय आम्ही, World Tour च प्लॅनिंग, ___मुळे मिळालं माझ्या, आयुष्याला Meaning

आजोबा झालो तरी, मी अजूनही हिरो दिसतो, तुमच्या आजीकडे प्रेमाने, एक टक बघत बसतो

रोज सकाळी उठून, पितो भरपूर पाणी, __च्या सोबत गातो, आनंदाने गाणी

योगामुळे मिळविले, डायबिटीस वर नियंत्रण, __शी भांडण म्हणजे, high BP ला निमंत्रण  

मुरेल तितका होतो Tasty, प्रेमाचा मुरांबा, ___ चिडते तेव्हा भासते, ditto जगदंबा 

सोसता सोसेना, हा संसाराचा ताप, ___राव अजूनही सुधारले नाहीत, होऊन २ मुलांचे बाप

___भेटल्यापासून, झालो मी पूर्ण, पोटांच्या तक्रारीसाठी, आजच घ्या कायम चूर्ण

मोगऱ्याच्या झाडावर, फुलल्या होत्या कळ्या, __रावांचे दात म्हणजे, मोडक्या दरवाज्याच्या फळ्या

द्वारकेत कृष्ण, अयोध्येत राम, ___रावांचे चरण, हेच माझे चारही धाम