नमस्कार चिरतरुण मित्रमंडळींनो,
आज आम्ही साठी ओलांडलेल्या आमच्या खास वाचकांसाठी खास उखाणे घेऊन आलो आहोत.

आता तुम्ही म्हणाल, “या वयात कसले आलेत उखाणे? अहो आमच्या नातवंडांची लग्नाची वयं झाली. जाड भिंगाचा चष्मा आला, गुडघ्याच्या वाट्याही झिजल्या, कवळीही येईल लवकरच. आता कसले उखाणे आणि कसलं काय!”

अरेरे.. काय हे तुमचे विचार! वय झालं म्हणून काय झालं, अहो म्हातारपण म्हणजे दुसरे बालपण. देवाने पुन्हा एकदा मौजमजा करण्याची दिलेली नामी संधी. मग आता घ्या ना बिनधास्त जगून!

सगळे दिवस मस्त साजरे करा. लहर आली की हे उखाणे घेऊन तुमच्या जोडीदाराला परत तरुणपणीच्या दिवसांची आठवण करून द्या.

अगदीच नाही, तर लग्नाच्या वाढदिवसाला तरी हे उखाणे घ्या.

शेवटी, तुम्ही केवळ शरीराने तरुण असण्यापेक्षा, मनाने किती चिरतरुण आहेत हे महत्वाचं, हो ना?

काय मग? घेणार ना हे उखाणे?
हे उखाणे कसे घ्याल?
स्त्रिया आणि पुरुष, असे दोघेही हे उखाणे घेऊ शकतात. तुम्ही तर इतक्या वर्षांमध्ये उखाण्यांची पारायणं केली असतील. त्यामुळे उखाणे कसे घ्यायचे हे आम्ही नव्याने काय सांगणार? चला तर मग, उखाणे बघूया.

तुळशीची करते पूजा, शंकराची करते आराधना, ___रावांना दीर्घायुष्य लाभो, हीच परमेश्वराला प्रार्थना

हाताने करावे काम, मुखाने म्हणावे राम, ___रावांचे चरण, हेच माझे चारधाम

मंदिरात वाहते, फूल आणि पान, ___रावांचे नाव घेते, ठेऊन सर्वांचा मान

गणपतीपुळेचा beach, आहे छान फिरायला, ___राव जाऊ चला, गणपतीच्या दर्शनाला 

कोरा कागद, निळी शाई, रोज देवळात जाण्याची,___ला असते घाई

पन्नाशी झाली, साठी झाली, आली आता सत्तरी, वय झाले, आता तरी थांबवा, तुमची चेष्टा- मस्करी

सुखदुःखाच्या धाग्यांनी, जीवन वस्त्र विणले, ___रावांच्या सहवासाचे, भाग्य मला लाभले

वाट जीवनाची, झाली सुखद आनंदी, ___रावांची साथ, मिळाली पदोपदी

चंद्राला पाहून, भरती येते सागराला, ___ची उत्तम साथ, मिळाली माझ्या जीवनाला

___ आणि माझं नातं, आंबा कैरीची फोड , आंबट वाटलं आधी जरी, पिकल्यावर मात्र गोड