नमस्कार मित्रमंडळींनो,
नवीन नवीन लग्न झाल्यानंतर मुलींसाठी अवघे विश्वच बदलते. नवे घर, नवी नाती आणि नवी हळवी प्रीती. अशा वेळी नव्या वातावरणाशी जुळवून घेताना एका बाजूला माहेरची ओढ, तर दुसऱ्या बाजूला फुलणाऱ्या नात्यांचा ओहोळ.
पण प्रेमळ जोडीदाराची साथ असेल, तर सर्व काही सोपे होऊन जाते. म्हणूनच आम्ही सादर करत आहोत, नव्या लग्नाची नवलाई सांगणारे खास मराठी उखाणे.
हे उखाणे कसे घ्याल?
अगदी सोप्पं आहे. फक्त रिकाम्या जागी तुमच्या जोडीदाराचे नाव घ्या. एवढंच! आहे की नाही सोप्पं?
चला तर मग, उखाणे बघूया.
आकाशात चमकतात, चंद्र आणि तारे,
___रावांसाठी, सोडून आले मी सारे
नव्या घरात शोभून दिसते, डायनिंग टेबल,
माझ्या नावासमोर लागले, ___रावांच्या नावाचे लेबल
नव्या आयुष्याची, नवी नवी गाणी,
___च्या घराण्यात, ___ रावांची झाले राणी
वाहते चहूकडे, शुभ्र हे चांदणे,
___रावांच्या घरी झाले, सुरु माझे नांदणे
लग्न झाल्यावर मुलगी होते, माहेरची पाहुणी,
___रावांच्या घराची, झाले मी गृहिणी
माहेरी साठवले, मायेचे मोती,
__च नाव घेऊन, जोडते नवी नाती
गुलाबाचे फूल, मोहक आणि ताजे,
__च्या येण्याने, भाग्य उजळले माझे
माझ्या गुणी __ला, पहा सगळ्यांनी निरखून,
जणू कोहिनूर हिरा, आणलाय आम्ही पारखून
नव्या नव्या घरात, कोणीही जाईल गांगरून,
__चुकली कुठे तर, घ्या जरा सावरून
बहिणीसारख्या नणंदा, भावासारखे दीर,
___रावांचे नाव घ्यायला, झाले मन अधीर